परंडा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत भजन, भक्तीगीत व भावगीत गायनाचा बहारदार अत्यंत सुरेख आणि सुंदर कार्यक्रम “दीपोत्सव” परंडा शहरात रविवार दि. 8 नोव्हेंबर रोजी प्रितम मंगल कार्यालय येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. 

या कार्यक्रमाचा शुभारंभ भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. दादासाहेब खरसडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव येथील उपकेंद्राचे प्रा.डॉ.गणेश शिंदे, युवा कीर्तनकार ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर.ह.भ.प.सतीश महाराज सूर्यवंशी, ह.भ.प.रोडगे महाराज, प्रा.डॉ.गणेश शिंदे,नागेश मांजरे,अरुण बुरांडे,अभय तथा शाम पाटील, बाबा वांबूरकर आदी उपस्थित होते. 

या ‌‘दिवाळी पहाट' कार्यक्रमात प्रसिद्ध गायनाचार्य ह. भ. प. सतीश सूर्यवंशी महाराज, गायिका अपर्णा अभय पाटील तसेच तालुक्यातील नवोदित गायकांनी सुमधुर आवाजात बहारदार भक्तिगीते, भावगीते व भजन सादर करून श्रोत्यांची भरभरून दाद मिळविली. गायकांना प्रसिद्ध तबला वादक सुमीत कठारे व शुभम सूर्यवंशी यांनी साथ दिली. तर कार्यक्रमाच्या प्रारंभी परमेश्वर माने यांनी सुमधुर बासरी वादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय परदेशी यांनी केले.

यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन परंडा शहरात हा पहिलाच भल्या सकाळी होणारा अशा प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम असून त्यास प्रतिसाद दिल्याबद्दल उपस्थित श्रोत्यांचे तसेच आयोजक प्रा. डॉ. गणेश शिंदे यांना धन्यवाद देऊन आभार व्यक्त केले. कार्यक्रमा नंतर उपस्थितांनी अतिशय चांगला कार्यक्रम झाल्याचे सांगून दरवर्षी असा कार्यक्रम घ्यावा, असे सुचविले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ, शिंदे आणि त्यांच्या सहका-यांनी परिश्रम घेतले. 

 
Top