धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकत्याच आयोजित केलेल्या जाबील कंपनीच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये   धाराशिव, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांतील आयटीआय, डिप्लोमा तसेच पदवी अभ्यासक्रमांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जॅबिल कंपनीच्या वतीने यांत्रिकी अभियांत्रिकी तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या शाखांमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. कंपनीचे प्रतिनिधी श्री. आकाश गायकवाड, श्री. प्रदीप नागमोडे, श्री. गणेश कदम आणि श्री. सचिन तांदळे यांनी मुलाखतींच्या विविध फेऱ्या घेतल्या. अंतिम निवड प्रक्रियेनंतर एकूण 11 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित रोजगार मेळाव्यात रांजणगाव (पुणे) येथील आंतरराष्ट्रीय कंपनी जॅबिल ने एकूण 11 विद्यार्थ्यांची निवड केली. विशेष म्हणजे, यामध्ये तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश असून महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.तसेच इतर कॉलेज च्या पण विद्यार्थ्यांची निवड झाली. या मध्ये प्रत्येकी 2 विद्यार्थी बिडवे इंजिनीरिंग लातूर आणि बी आय टी बार्शी तसेच प्रत्येकी 1 विद्यार्थी सेवरी पंढरपूर आणि एस बी पाटील इंदापूर कॉलेज या प्रमाणे निवड झाली.

यामध्ये तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विभागातील काझी सोहेल, राजवर्धन औराडे, प्रदीप कबुतरे, करण हातागले आणि राज जोगदंड या पाच विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले, “तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे रोजगार मेळावे आयोजित करून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असते. आगामी काळातही अनेक नामांकित कंपन्यांनी रोजगार मेळाव्यांसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.“

जॅबिल ही अमेरिकेतील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी असून, जगभरातील विविध कंपन्यांसाठी इलेक्ट्रॉनिक उत्पादने व औद्योगिक उपकरणे यांचे डिझाइन, उत्पादन आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनाशी संबंधित सेवा पुरवते. अशा आंतरराष्ट्रीय कंपनीत विद्यार्थ्यांना संधी मिळणे ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. या रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा .अशोक जगताप, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, श्री. रणजित दंडनाईक, श्री. रामेश्वर मुंढे आणि श्री. रणजित जराड यांनी विशेष परिश्रम घेतले.

या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, महाराष्ट्र शासनाच्या मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील, संस्थेचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, सर्व विभागप्रमुख, विभागातील सर्व प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांनी मनापासून अभिनंदन केले असून, त्यांच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top