धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील अग्निशमन दलाची सेवा अधिक सक्षम व अद्ययावत करून आवश्यक अग्निशमन वाहने, आधुनिक साधनसामग्री, पुरेसा इंधनसाठा तसेच अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी धाराशिव शहर काँग्रेस कमिटीचे वतीने जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धनंजय राऊत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आग लागणे, इमारतींना आग लागणे, शॉर्टसर्किट, अपघात तसेच नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या प्रसंगी अग्निशमन दलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अशा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी अग्निशमन दलाकडे पुरेशी व आधुनिक वाहने, प्रशिक्षित कर्मचारी आणि आवश्यक साधनसामग्री उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
धाराशिव शहर व जिल्ह्याच्या गरजेनुसार आधुनिक अग्निशमन गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, सध्या कार्यरत वाहनांची नियमित देखभाल करावी, वाहनांमध्ये पुरेसा पाणीसाठा, पंप, पाइप, शिड्या, हायड्रॉलिक कटर व ब्रेकर यांसारखी आधुनिक उपकरणे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अग्निशमन वाहनांसाठी पुरेसा डिझेल साठा उपलब्ध करून देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना फायरप्रूफ कपडे, हेल्मेट, ऑक्सिजन मास्क, श्वसन उपकरणे, हातमोजे, बूट व इतर सुरक्षा साहित्य देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय अग्निशमन कर्मचाऱ्यांना आधुनिक उपकरणे हाताळण्याचे नियमित प्रशिक्षण द्यावे, ग्रामीण व शहरी भागात तातडीने मदत पोहोचण्यासाठी प्रभावी नियोजन करावे आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून 24 तास अग्निशमन सेवा तत्पर ठेवावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
आग लागल्यानंतर मदत पोहोचण्यास विलंब होणे किंवा आवश्यक साधनसामग्री उपलब्ध नसणे यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अग्निशमन दल केवळ नावापुरते सक्षम न राहता प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी प्रभावीपणे काम करण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच निवेदनातील मागण्यांवर केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी धनंजय राऊत यांनी केली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्यासह खलील सय्यद,प्रशांत पाटील,अग्निवेश शिंदे, गोरोबा झेंडे, राजुदास आडे, अशोक बनसोडे, आरिफ मुलानी, पोपट शिंदे, अविनाश रणखांब, विश्वजीत बनसोडे, बाबा मोमीन, अभिमान पेठे, दयानंद नागापुरे, अंकुश पेठे, जयसिंग पवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी उपस्थित होते.
