कळंब (प्रतिनिधी)- कळंब-ढोकी या महत्त्वाच्या मार्गावर मोठमोठ्या कापड दुकानांसमोर उभ्या राहणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुकानांमध्ये खरेदीसाठी येणारे ग्राहक आपली दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला तसेच रस्त्यावरच उभी करत असल्याने या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी वाहनधारक, प्रवासी आणि पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे.
कळंब-ढोकी रस्ता हा परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. या मार्गावर दिवसभर दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने तसेच प्रवासी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा गजबजलेल्या रस्त्यावर कापड दुकानांसमोरच वाहनांच्या रांगा लागल्याने रस्त्याची रुंदी कमी पडत आहे. अनेकदा समोरासमोरून येणाऱ्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे सणासुदीच्या काळात तसेच खरेदीच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिकच गंभीर होते. दुकानांसमोर पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्याने ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावावा लागतो. दुचाकीस्वारांना वाहनांमधून वाट काढताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या वाहतूक कोंडीमुळे केवळ वेळेचा अपव्यय होत नाही, तर एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एखाद्या रुग्णवाहिकेला किंवा अग्निशमन वाहनाला या गर्दीतून मार्ग काढावा लागल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
