धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या खत वितरण व्यवस्थेतील महत्त्वाकांक्षी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल' या प्रकल्पाची राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये 22 ऑक्टोबर 2026 पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे.या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शेतकरी,कृषी निविष्ठा विक्रेते तसेच कृषी व महसूल विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश कृषी आयुक्तालयाकडून देण्यात आले आहेत.त्यानुसार जिल्ह्यात व्यापक प्रसिद्धी,प्रशिक्षण,जनजागृती आणि आवश्यक प्रशासकीय यंत्रणा उभारण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
केंद्र शासनाच्या माध्यमातून खत वितरणासाठी ही नवीन महत्त्वाकांक्षी प्रणाली राबविण्यात येत आहे.या प्रकल्पांतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्प्याची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे.या प्रणालीमध्ये मोबाईल बेस ॲपद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या त्यांच्या खात्यांचे बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना विक्रेत्यांकडे रांगेत उभे राहावे लागणार नाही. तसेच वारंवार हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या निवडीनुसार खतांचे बुकिंग करता येणार असल्याने लिंकिंगपासून त्यांची सुटका होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर खतांच्या काळाबाजारालाही आळा बसण्यास मदत होणार आहे.