तुळजापूर (प्रतिनिधी)- कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघ वाचविण्यासह लोकशाही आणि सहकार चळवळीच्या संरक्षणासाठी काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेत तुळजापूरच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपला पाठिंबा दर्शविला. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धीरज पाटील आणि काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष तथा नगर परिषदेतील गटनेते अमोल कुतवळ यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या संघर्ष यात्रेत सहभाग नोंदविला.
‘महाराष्ट्रधर्म व गोकुळ वाचवण्यासाठी आम्ही धाराशिवकर कोल्हापूरसोबत' असा संदेश देणारे बॅनर घेऊन धाराशिवकर काँग्रेस कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते. या लक्षवेधी बॅनरने संघर्ष यात्रेत उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. कोल्हापूरच्या सहकार चळवळीशी धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट दाखविल्याचे या माध्यमातून अधोरेखित झाले.
सत्तेच्या जोरावर सहकार क्षेत्रातील संस्था संपविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि सहकार चळवळीचे अस्तित्व टिकविण्यासाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. गोकुळ दूध संघ हा केवळ दूध उत्पादकांचा संघ नसून शेतकरी, दूध उत्पादक आणि सहकार क्षेत्राशी जोडलेल्या हजारो कुटुंबांच्या आर्थिक जीवनाचा आधार असल्याची भावना यावेळी सहभागी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
सहकार चळवळ मजबूत राहिली तरच शेतकरी आणि दूध उत्पादकांना न्याय मिळू शकतो. त्यामुळे गोकुळ वाचविण्याचा हा लढा केवळ कोल्हापूरपुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राच्या भवितव्याशी संबंधित आहे, अशी भूमिका धाराशिवच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या सहभागातून मांडली.
