धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मध्यरात्री घडलेली आगीची भीषण दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी आहे. करंडे गिफ्ट सेंटर व किराणा दुकानाला लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले आणि शेजारील घरालाही आपल्या कवेत घेतले. या अग्नितांडवात एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेतील सर्वाधिक काळीज पिळवटून टाकणारी बाब म्हणजे आपल्या मुलींचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या पित्याने स्वतःचे प्राण गमावले. मुलींना वाचवण्यासाठी एका बापाने केलेला शेवटचा संघर्ष आठवला तरी मन हेलावून जाते. काळाने एका क्षणात संपूर्ण कुटुंबच हिरावून घेतले. या घटनेचे दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. अशी प्रतिक्रिया आमदार कैलास पाटील यांनी येडशी येथील प्रत्यक्ष भेटीनंतर दिली आहे. 

घटनेची माहिती मिळताच पहाटेच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आणि बचावकार्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या. गावकरी, पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, एका तरुणाचा जीव वाचला असला तरी सहा निष्पाप जीवांना वाचवता आले नाही, ही मनाला कायमची वेदना देणारी बाब आहे.

या दुर्घटनेत उत्तम त्रिंबक करंडे, चंद्रकला उत्तम करंडे, गोविंद उत्तम करंडे, ज्योती गोविंद करंडे, गायत्री गोविंद करंडे आणि सिद्धी गोविंद करंडे या सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा अंत होणे ही कधीही न भरून येणारी हानी आहे. या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि या असह्य दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या आप्तस्वकीयांना मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

 
Top