धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील येडशी येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या भीषण अग्नितांडवात एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुकानाला लागलेली आग शेजारील घरात पसरल्याने ही हृदयद्रावक दुर्घटना घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माहिती मिळताच पहाटे चार वाजता घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्याला गती देण्यासाठी त्यांनी स्वतः घटनास्थळी थांबून संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

पहाटे तीनच्या सुमारास करंडे किराणा स्टोअर्स अँड गिफ्ट वेअर या दुकानाला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करत दुकानाला लागून असलेल्या घरालाही वेढा घातला. घरात कुटुंबातील सदस्य अडकले असल्याची माहिती मिळताच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्याची सूत्रे हलवली. तुळजापूर आणि कळंब येथून अग्निशमन दलाची वाहने मागविण्यासह कळंब, धाराशिव आणि तुळजापूर येथून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

गावकरी, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच घरातील व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचा आढावा घेतला आणि यंत्रणांमध्ये समन्वय साधत मदतकार्याला गती दिली. या प्रयत्नांमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यात यश आले. मात्र, सर्वतोपरी प्रयत्न करूनही सहा जणांचे प्राण वाचवता आले नाहीत. ही बाब अत्यंत वेदनादायी असल्याची भावना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.

या दुर्घटनेत उत्तम त्रिंबक करंडे (75), चंद्रकला उत्तम करंडे (70), गोविंद उत्तम करंडे (47), ज्योती गोविंद करंडे (42), गायत्री गोविंद करंडे (16) आणि सिद्धी गोविंद करंडे (15) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. करंडे कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचा आहे. या दुर्घटनेतील मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या असह्य दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थनाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली.

 
Top