तुळजापूर (प्रतिनिधी)- एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना ग्रामीण भागातील जनतेला पाणीपुरवठा सुरळीत करण्याची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या तुळजापूर येथील कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवर काम करणारे हे कार्यालय की मद्याच्या बाटल्यांचा साठा करण्याचे ठिकाण, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी अधिक महत्त्वाची झाली आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, पाणी योजनांची देखभाल आणि नागरिकांच्या पाणीविषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी या कार्यालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, याच कार्यालयाच्या भिंतीलगत आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या पडलेल्या असल्याचे चित्र समोर येत आहे.
