धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी महामानवाला अभिवादन करत 'जय भीम! जय संविधान!' अशा गगनभेदी घोषणा दिल्या. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे, स्वाभिमानाचे आणि प्रतिष्ठेचे संरक्षण करणारे सर्वोच्च मार्गदर्शक आहे. विशेषतः शोषित, पीडित, वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाला न्याय, समान संधी आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्यामुळे संविधान दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रमाचा दिवस नसून संविधानाने दिलेल्या अधिकारांची जाणीव ठेवून त्यांचे संरक्षण करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान ही भारतीय लोकशाहीची खरी ताकद आहे. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये केवळ भाषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष समाजजीवनात रुजली पाहिजेत. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे आणि कोणत्याही नागरिकाच्या घटनात्मक अधिकारांवर गदा येता कामा नये. संविधानाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून अन्याय, विषमता आणि शोषणाविरोधात संविधानिक मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी आरपीआय (खरात)चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, वंचित बहुजन आघाडीचे मा. जिल्हा संघटक विकास बनसोडे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा महासचिव भाई फुलचंद गायकवाड (पाटील), अॅड. दिलीप कांबळे, सोमनाथ डाके आणि प्रभू ताकपिरे,सुनील वाघमारे,यांच्यासह आंबेडकरवादी कार्यकर्ते व संविधानप्रेमी नागरिक उपस्थित होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन आणि संविधान रक्षणाचा संकल्प करून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
