तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठवाड्यात सध्या तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या भीषण वास्तवाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि तात्काळ उपाययोजना राबविण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मराठवाडा विभागाच्या वतीने तुळजापूर येथे आक्रमक आंदोलन पुकारण्यात आले आहे. रविंद्र भिमाशंकर इंगळे यांच्या नेतृत्त्वाखाली दिनांक 07/11/2026 रोजी तुळजापूर येथील जुन्या बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.  

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर होऊन बरेच दिवस लोटले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हवा तसा दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 1,00,000 (एक लाख) रुपये मदत त्वरित खात्यात जमा करावी, जनावरांना छावणी ऐवजी थेट दाोला चारा उपलब्ध करून द्यावा, आणि विहिरी आटल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीतील गाळ काढण्यासाठी कृषी विभागामार्फत आर्थिक मदत जाहीर करावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.  

तसेच, उसाची  5000 रुपये करावी, उसाची पहिली उचल MSP 5000 रुपये द्यावी, शेतकऱ्यांना 100 टक्के पीक विमा तात्काळ वाटप करावा आणि सन 2025 च्या पीक विम्यातून वगळलेल्या शेतकऱ्यांना हक्काची रक्कम त्वरित खात्यात जमा करावी, अशी प्रमुख मागणीही या आंदोलनादरम्यान केली जाणार आहे. याशिवाय शेतकरी कुटुंबांचे बंद पडलेले रेशनधान्य पूर्ववत चालू करणे, खासगी सरकारी बँका व मायक्रो फायनान्सच्या कर्जवसुलीला स्थगिती देणे, तसेच शेतीकामासाठी घेतलेले टॅक्टर व यंत्रांच्या हप्त्यांची वसुली थांबवणे यांसारख्या मागण्यांवरही भर देण्यात आला आहे.  शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

 
Top