धाराशिव (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांचा जागर करीत, संविधानाप्रती आदर आणि नशामुक्त समाजाच्या निर्मितीचा निर्धार आज धाराशिव शहरातील विद्यार्थ्यांनी केला.भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे आयोजित कार्यक्रमात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.तसेच शहरातून जनजागृती रॅली काढून संविधानाच्या मूल्यांसह नशामुक्त धाराशिवचा संदेश देण्यात आला.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले व समाज कल्याण अधिकारी सनम लांबकाने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा जोतिराव फुले आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच मुंबईतील 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आणि प्राण गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन केले. यावेळी डॉ.संदीप तांबारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली. संविधान दिनानिमित्त काढण्यात आलेल्या या रॅलीत विद्यार्थ्यांनी नशामुक्त धाराशिवच्या घोषणांद्वारे जनजागृती केली. या कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी लांडगे, विस्तार अधिकारी मैंदरगी, जंगम,समाज कल्याण निरीक्षक अतुल जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी,तसेच विविध विद्यालयाचे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
