धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्तीचा निर्णय ग्रामविकास विभागाकडून संख्या निश्चित करताना अपूर्णांक येत आहे. अशावेळी अपूर्णांकातील संख्या पुर्णांकात कशी निश्चित करावी या बाबत मार्गदर्शन मागविले आहे. पुढील आठवड्यात याबाबतचा निर्णयाची माहिती मिळेल अशी माहिती उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे यांनी पु. वि. लोकराज्यच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. 

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली प्रक्रिया आता मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ग्रामविकास विभागाने एप्रिल महिन्यात स्वीकृत सदस्य नियुक्तीचा निर्णय घेतल्यानंतर गट नोंर्दीीची प्रक्रियाही पूर्ण झाली. त्यानंतर 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र आचारसंहिता आणि अन्य कारणांमुळे प्रत्यक्ष नियुक्त्या होवू शकल्या नाहीत. दरम्यान, सांगली जिल्हा परिषदेत नुकतीची स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अन्य जिल्हा परिषदांमधील निवडींचाही मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी गटांची नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात यापूर्वीच झालेली आहे. मात्र सदस्य संख्येच्या गणनेबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने सामान्य प्रशासन विभागाकडून पुढील कार्यवाही झालेली नाही. 

धाराशिवसह राज्यातील काही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची संख्या निश्चित करताना अपूर्णांक येत आहे. अशा वेळी अपूर्णांकातील संख्या पूर्णांकात कशी निश्चित करावी याबाबत ग्रामविकास विभागाकडून स्पष्ट मार्गदर्शन उपलब्ध नसल्याने नियुक्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने ग्रामविकास विभागाकडे यासंदर्भात मार्गदर्शन मागविले आहे. पुढील आठवड्यात याचे उत्तर प्राप्त होण्याची शक्यता असून, त्यानंतर नियुक्ती प्रक्रियेला गती मिळणार आहे. धाराशिव जिल्हा परिपषदेत एकूण 55 सदस्य असून, त्याच्या दहा टक्के सदस्य स्वीकृत म्हणून घ्यायचे आहेत. हा आकडा 5.5 इतका येतो. अशा वेळी 5 सदस्य स्वीकृत घ्यायचे की 6 सदस्य घ्यायचे यासंदर्भात मार्गदर्शन मिळालेल नाही. जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांच्या बाबतीत देखील हा प्रश्न उद्भवत आहे. 


 
Top