कळंब (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत 8 ऑगस्ट 2026 रोजी घेण्यात आलेल्या बालचित्रकला स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 6 हजार 761 विद्यार्थ्यांचा निकालच जाहीर झाला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी काढलेली चित्रे राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी पाठविण्यात न आल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांकडून घेतलेली स्पर्धा फी परत करावी, अशी मागणी राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत दरवर्षी चार गटांत बालचित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा 8 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह धाराशिव जिल्ह्यातही ही स्पर्धा घेण्यात आली. जिल्ह्यातील 138 शाळांमधील 6 हजार 761 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. प्रत्येक विद्यार्थ्याकडून 20 रुपये शुल्क जमा करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातून एकूण 1 लाख 35 हजार 220 रुपये जमा झाले. मात्र, स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा समावेशच नसल्याचे स्पष्ट झाले.
चित्रे मूल्यांकनासाठी गेलीच नाहीत?
स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची चित्रे राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी पाठविण्यात आली नसल्यामुळे जिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्याचा निकाल जाहीर झाला नसल्याचा आरोप तांबारे यांनी केला आहे. तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावरील पारितोषिकांच्या संधीपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांनी उत्साहाने स्पर्धेत सहभाग घेतला, शुल्क भरले; मात्र त्यांच्या चित्रांचे मूल्यांकन झाले की नाही, याबाबतच प्रश्न उपस्थित होत आहेत. या स्पर्धेचे जिल्हास्तरीय सनियंत्रण आणि जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे असतानाही असा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील 138 शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागाची नोंद असताना चित्रे राज्यस्तरावर पाठविण्याची प्रक्रिया नेमकी कुठे रखडली, त्याला जबाबदार कोण, तसेच जमा झालेल्या शुल्काचा विनियोग कसा झाला, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा
या प्रकरणी बाळकृष्ण तांबारे यांनी 22 ऑक्टोबर रोजी निवेदन देऊन महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, लातूर आणि जिल्हा परिषद धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाद मागितली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने चित्रांचे मूल्यांकन आणि निकालाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून शुल्क जमा करूनही त्यांच्या चित्रांचे मूल्यांकन झाले नसेल, तर हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देणार का, संबंधितांची जबाबदारी निश्चित करणार का आणि जमा केलेले शुल्क परत करणार का, याकडे आता पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचे लक्ष लागले आहे.