धाराशिव (प्रतिनिधी)- एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि. जागजी कारखान्याने चालू तृतीय गळीत हंगाम 2026-27 मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत ऊस बिल अदा करण्याची परंपरा कायम राखली आहे. चौथ्या पंधरवड्यात कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या 15 हजार 493 मेट्रिक टन उसाचे प्रतिटन 3 हजार 100 रुपये दराने एकूण 4 कोटी 80 लाख रुपयांचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.
कारखान्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताला प्राधान्य देत गाळपासाठी आलेल्या उसाचे बिल निर्धारित वेळेत अदा करण्यावर भर दिला आहे. चाचणी गळीत हंगामापासूनच अवघ्या पंधरा दिवसांत ऊस बिल अदा करण्याची परंपरा एन.व्ही.पी. शुगर परिवाराने सुरू केली असून, चालू गळीत हंगामातही ती कायम ठेवली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला वेळेत मिळावा, तसेच शेतीच्या पुढील हंगामाचे आणि कौटुंबिक खर्चाचे आर्थिक नियोजन करता यावे, या दृष्टीने कारखाना व्यवस्थापनाकडून नियमितपणे ऊस बिलाचे वितरण केले जात आहे. वेळेत होणाऱ्या या बिलामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे.
दरम्यान, ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या बँक खात्याशी संबंधित आवश्यक कागदपत्रे कारखान्याकडे जमा केलेली नाहीत, त्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., धाराशिव येथील बँक पासबुकची छायांकित प्रत कारखाना साईटवर जमा करावी, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन नानासाहेब ऊर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.
