भुम (प्रतिनिधी)- पंढरपूर ते शेगाव प्रस्तावित भक्ती रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी पंढरपूरशेगाव भक्ती रेल्वे मार्ग कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची कुर्डुवाडी येथे मध्यरात्री एक वाजता भेट घेतली. यावेळी प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत सविस्तर चर्चा करून या प्रकल्पासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली.
पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर या दोन प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा रेल्वे मार्ग वारकरी, भाविक आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मार्गामुळे पंढरपूर, कुर्डुवाडी, परंडा, भूम, वाशी, मांजरसुंबा, बीड, जालना आणि खामगाव परिसरातील अनेक गावांना रेल्वे जोडणीचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
विशेषतः कुर्डुवाडी ते मांजरसुंबा तसेच पुढील रेल्वे जोडणीच्या अनुषंगाने या मार्गाची आवश्यकता केंद्रीय मंत्री आठवले यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. रेल्वे मार्गामुळे या भागातील दळणवळण, व्यापार, धार्मिक पर्यटन, रोजगार आणि औद्योगिक विकासाला चालना मिळू शकते. त्यामुळे या प्रकल्पाला गती देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
या बैठकीस कृषी व पशुसंवर्धन सभापती नवनाथ आप्पा जगताप, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, कुर्डुवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष बापू जगताप, भक्ती रेल्वे मार्ग कृती समितीचे कार्याध्यक्ष संतोष वरळे सर, येणेगावचे सरपंच शहाजी नाईकनवरे, आलीम सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयकुमार बनसोडे, रिपाइंच्या आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
