उमरगा (प्रतिनिधी)- गुंजोटी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य शिवस्मारकाचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्याला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यकर्त्यांना धारेवर धरत 2029 च्या निवडणुकीत सत्तांतर घडविण्याचा सज्जड इशारा दिला. त्यामुळे या सोहळ्याची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा रंगली आहे.
गुंजोटीच्या बाहेर पेठेतून सुरू झालेल्या भव्य मिरवणुकीत मराठा बांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांचा गजर, भगवे झेंडे आणि शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य शिवस्मारकाचा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरग्याचे नगराध्यक्ष किरण गायकवाड होते. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, आमदार डॉ. प्रशांतसिंह पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, प्रा. सुरेश बिराजदार, बाबा पाटील, जितेंद्र शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषाताई गायकवाड, ॲड. अभयराजे चालुक्य, शहाजी पाटील, महेश देशमुख, स्नेहा जाधव, ॲड. आर. जी. जाधव, प्रा. व्ही. एम. जाधव, धनराज जाधव, आण्णासाहेब पवार, अमित चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, आमदार डॉ. प्रशांतसिंह पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रम चव्हाण यांनी केले.
या सोहळ्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण, तरुणांचा रोजगार, समाजाचे भवितव्य आणि आगामी 2029 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आक्रमक भाषणामुळे कार्यक्रमाला वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले. शिवरायांच्या स्मारकाच्या अनावरणासोबतच मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारा हा सोहळा गुंजोटीच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.
