भूम (प्रतिनिधी)- कार्तिकी वारीनिमित्त सद्गुरू शामनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र सामानगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्याचे शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. यावेळी परिसरातील भाविक, वारकरी व भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विठ्ठल नामाचा जयघोष केला.

श्री सद्गुरू शामनाथ महाराज देवस्थानच्या वतीने आयोजित या दिंडी सोहळ्यात पताकाधारी, टाळकरी, भजनकरी, मृदंगाचार्य तसेच महिला वारकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. टाळ-मृदंगाचा गजर, भगव्या पताकांची शोभा, विठ्ठल-रखुमाईचा जयघोष आणि भजन-कीर्तनाच्या भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. दिंडीच्या प्रस्थानामुळे सामानगाव परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

दिंडीच्या प्रवासात विविध ठिकाणी मुक्कामाचे नियोजन करण्यात आले आहे. १४ नोव्हेंबर रोजी नृसिंहनाथ, १५ नोव्हेंबर रोजी आसू, १६ नोव्हेंबर रोजी खिंडारे, १७ नोव्हेंबर रोजी माढा, १८ नोव्हेंबर रोजी वडाचीवाडी आणि १९ नोव्हेंबर रोजी रोपळे येथे मुक्काम राहणार आहे. त्यानंतर २० ते २३ नोव्हेंबरदरम्यान पंढरपूर येथे दिंडीचा मुक्काम राहणार आहे.

२४ नोव्हेंबर रोजी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी काला करून दिंडी सामानगावकडे परतीच्या प्रवासाला निघणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र सामानगाव येथे आरती करून दिंडी सोहळ्याची सांगता होणार आहे. या पायी दिंडीच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्तिभाव आणि आध्यात्मिक विचारांचा जागर करण्यात येत आहे. महिला वारकऱ्यांसह विविध वयोगटांतील भाविकांचा सहभाग हे या दिंडी सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top