धाराशिव (प्रतिनिधी)- दररोजच्या धावपळीच्या जीवनात माणूस स्वतःच्या कुटुंबाचा, समाजाचा आणि भविष्याचा विचार करतो. मात्र,मृत्यूनंतरही आपले शरीर समाजाच्या उपयोगी पडावे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत व्हावी आणि वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला हातभार लागावा, या उदात्त हेतूने देहदानाचा संकल्प करणे ही खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा आहे. याच सामाजिक बांधिलकीतून सारोळा येथील अण्णा कठारे यांनी देहदानाचा महत्त्वपुर्ण निर्णय घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान यांच्या हस्ते त्यांच्या देहदानाची नोंदणी करण्यात आली.
देहदान हे केवळ दान नसून मृत्यूनंतरही समाजासाठी योगदान देण्याची एक महान संधी आहे. वैद्यकीय शिक्षणामध्ये मानवी शरीररचनेचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. भावी डॉक्टरांना मानवी शरीराची रचना, विविध अवयवांची कार्यपद्धती आणि शरीरातील गुंतागुंती समजून घेण्यासाठी देहदानातून मोठी मदत होते. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासह भविष्यातील आरोग्यसेवेला सक्षम करण्यासाठी देहदान मोलाची भूमिका बजावते असे मनोगत व्यक्त करीत अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांनी देहदान नोंदणी करणारे अण्णा मुरलीधर कठारे यांचे अभिनंदन केले.
यावेळी ॲनाटॉमी (शरीररचना शास्त्र) विभागाच्या प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉ.स्वाती पांढरे, सुरक्षा समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे, ॲनाटॉमी विभागाचे प्रशांत बनसोडे, डॉ विवेक कोळगे, सुरक्षा समिती सदस्य सुपरवायझर मेजर दिपक झेंडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
