धाराशिव (प्रतिनिधी)- “सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा “ ही सह्याद्रीची खोरी आणि कड्या-कपारी महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास सांगणाऱ्या आहेत. या भागात वृक्षतोड करून फडणवीसांना महाराष्ट्राचा इतिहास पुसून टाकायचा आहे काय? हे जर त्यांचं तकलादू स्वप्न असेल,तर महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि निसर्गप्रेमी जनता त्यांचे हे स्वप्न कदापि पूर्ण होऊ देणार नाही. फडणवीसांना आमचं सांगणं आहे की,जो इतिहास विसरला त्याला भविष्य नसते. त्यामुळे महाराष्ट्राच्या भूमीतून महायुतीचे नामोनिशाण पुसून टाकायचं नसेल, तर त्यांनी कर्जत येथील वृक्ष तोड करण्याचे महापाप करू नये,“अशी घणाघाती टिका ठाकरे गटाचे युवासेना जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी केली आहे.
कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरेंट पॉवर प्रकल्पासाठी सह्याद्रीच्या संवेदनशील डोंगररांगांमध्ये होत असलेल्या अंदाधुंद वृक्षतोडीच्या विरोधात माजी पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ॲड. संजय भोरे यांनी देखील पत्रकाद्वारे सरकारवर तीव्र ताशेरे ओढले आहेत.
ॲड. भोरे यांनी सरकारला धारेवर धरताना म्हटले की, “हा सह्याद्री केवळ डोंगर आणि झाडांचा समूह नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्याचा जिवंत साक्षीदार आहे. या कड्या-कपारींनी आपल्याला लढायला शिकवले. याच ऐतिहासिक वारशाचा गळा घोटण्याचे काम सध्याचे महायुती सरकार करत आहे. एका बाजूला शिवरायांचे नाव घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी जिवापाड जपलेल्या सह्याद्रीच्या जंगलांवर कुऱ्हाड चालवायची, हा सरकारचा दुटप्पीपणा आता उघडा पडला आहे.
