धाराशिव (प्रतिनिधी)- व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीचे आयुष्यच नव्हे,तर त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते.व्यसनामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक,आर्थिक आणि आरोग्यविषयक समस्यांची जाणीव समाजाला करून देण्यासाठी तरुणाईने नाट्यकलेचा प्रभावी वापर केला.कुठे व्यसनामुळे होणारी कुटुंबाची वाताहत,तर कुठे व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व अशा विविध आशयांच्या नाटिका सादर करत विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनाचा संदेश दिला. निमित्त होते नशामुक्त भारत अभियानांतर्गत धाराशिव येथे आयोजित जिल्हास्तरीय नाटिका स्पर्धेचे.

सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय,धाराशिव आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियानांतर्गत व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी 15 ऑक्टोबर 2026 रोजी विद्यापीठ उपकेंद्रात जिल्हास्तरीय नाटिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राच्या संचालिका प्रा.मनीषा असोरे होत्या.जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यसनमुक्तीचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी नाट्यकला हे प्रभावी माध्यम ठरू शकते.विशेषतः तरुण पिढीमध्ये व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणे,या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धाराशिव येथील व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र,धाराशिव येथील विद्यार्थ्यांच्या संघांनी सहभाग नोंदविला.

सहभागी संघांनी नशामुक्त भारत अभियानाच्या संकल्पनेवर आधारित नाटिका सादर करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.आपल्या अभिनयातून आणि नाट्यसादरीकरणातून विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारण्याची गरज या सादरीकरणांतून अधोरेखित झाली. स्पर्धेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राच्या संघाने उत्कृष्ट नाट्यसादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकाविला.अणदूर येथील जवाहर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय क्रमांक,तर धाराशिव येथील व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला.

विजेत्या संघांना नाट्यशास्त्र व लोककला विभागाचे विभागप्रमुख प्रा.महेश्वर कळलावे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव ठेवून कलागुणांचे सादरीकरण केल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून व्यसनमुक्ती क्षेत्रातील डॉ.संदीप तांबारे,राष्ट्रीय सेवा योजनेशी संबंधित आर.पी.कॉलेज, धाराशिव येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.दत्तात्रय साखरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राच्या नाट्यशास्त्र विभागातील डॉ.उषा कांबळे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाला समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालयाचे अधीक्षक अमित चुंबळकर,समाज कल्याण निरीक्षक अतुल जगताप,युवराज चव्हाण,प्रा.गोविंद कोकणे,प्रा.मेघराज पाटील,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.विक्रम शिंदे यांच्यासह विद्यापीठ उपकेंद्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नशामुक्त भारत अभियानांतर्गत आयोजित या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीवही अधोरेखित झाली. व्यसनमुक्तीचा संदेश केवळ भाषणातून न देता तो नाट्यकलेच्या माध्यमातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी जनजागृती अत्यंत महत्त्वाची असून तरुणाईचा सक्रिय सहभाग या चळवळीला बळ देणारा ठरू शकतो.नाटिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिलेला व्यसनमुक्तीचा संदेश आणि सामाजिक प्रबोधनाचा प्रयत्न हे या जिल्हास्तरीय स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.

 
Top