मुरूम (प्रतिनिधी)-  कंटेकुर, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वाचन प्रेरणा दिन, जागतिक पांढरी काठी दिन आणि जागतिक हात धुवा दिनानिमित्त विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, दृष्टिबाधित व्यक्तींच्या अडचणींबाबत जाणीव जागृती करणे तसेच वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयींचे महत्त्व पटवून देण्याचा संदेश देण्यात आला.

भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. सुरवातीस डॉ. ए. पी. जी. कलम यांच्या प्रतिमेचे पूजन लक्षण येवते यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. कलाम यांना वाचनाची विशेष आवड होती. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य विद्यार्थ्यांसाठी सदैव प्रेरणादायी आहे.

या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना नियमित वाचन करण्याचे महत्त्व सांगण्यात आले. पुस्तकांमुळे ज्ञानात भर पडते, शब्दसंपत्ती वाढते, विचारशक्ती विकसित होते आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध होते, हे उपक्रमशील शिक्षक विजयकुमार कलशेट्टी यांनी समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांसोबतच गोष्टींची पुस्तके, चरित्रे, वर्तमानपत्रे, विज्ञानविषयक साहित्य आणि थोर व्यक्तींचे विचार यांचेही नियमित वाचन करावे, असे आवाहन करण्यात आले.

'दररोज वाचन करूया, ज्ञानाचा नवा मार्ग शोधूया', 'वाचाल तर वाचाल' आणि 'पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाची प्रगती' अशा घोषवाक्यांद्वारे वाचनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्यात स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकसित व्हावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक पांढरी काठी दिन म्हणून साजरा केला जातो. पांढरी काठी ही दृष्टिबाधित व्यक्तींसाठी केवळ चालण्याचे साधन नसून ती स्वावलंबन, आत्मविश्वास आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे. या दिनानिमित्त विद्यार्थ्यांना दृष्टिबाधित व्यक्तींच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, त्यांच्यासाठी उपलब्ध असलेली सहाय्यक साधने आणि समाजाने त्यांना सहकार्य करण्याची आवश्यकता याविषयी माहिती देण्यात आली. दृष्टिबाधित व्यक्तींना रस्ता ओलांडताना, सार्वजनिक ठिकाणी वावरताना तसेच विविध कामे करताना सहकार्य करणे आवश्यक आहे. मात्र, मदत करताना त्यांची परवानगी घेऊन आदरपूर्वक मदत करावी, हेही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. 

दृष्टिबाधित व्यक्तींना दयेची नव्हे, तर समान संधी, आदर आणि सहकार्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही क्षमता असते. योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास दिव्यांग व्यक्तीही शिक्षण, क्रीडा, कला, विज्ञान आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, हा सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यात आला. 'दृष्टिबाधितांचा सन्मान करूया, समावेशक समाज घडवूया' आणि 'समान संधी, समान हक्क' या संदेशांतून विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्यात आली. दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा केला जातो. हातांची योग्य प्रकारे स्वच्छता राखणे हा अनेक संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्याचा सोपा आणि प्रभावी उपाय आहे. अस्वच्छ हातांमुळे जंतू शरीरात प्रवेश करू शकतात आणि त्यामुळे अतिसार, पोटाचे विकार तसेच इतर संसर्ग होण्याचा धोका वाढतो. या दिनानिमित्त विद्यार्थ्यांना साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. जेवणापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर, बाहेरून आल्यानंतर, खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर तसेच हात अस्वच्छ झाल्यास हात स्वच्छ धुणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

हात धुताना तळहात, हातांची पाठ, बोटांमधील जागा, अंगठे, नखांच्या आसपासचा भाग आणि मनगट यांची स्वच्छता करावी. हात साबणाने किमान 20 सेकंद चोळून स्वच्छ पाण्याने धुवावेत, याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छ हात, स्वच्छ परिसर आणि निरोगी जीवन यांचा परस्पर संबंध विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः स्वच्छतेच्या सवयी अंगीकाराव्यात आणि आपल्या कुटुंबात तसेच समाजातही स्वच्छतेविषयी जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले.  वाचन प्रेरणा दिन, जागतिक पांढरी काठी दिन आणि जागतिक हात धुवा दिन हे तीनही दिन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. वाचनामुळे ज्ञानाची वाढ होते, पांढऱ्या काठी दिनामुळे दिव्यांगांविषयी संवेदनशीलता आणि सामाजिक समानतेची जाणीव निर्माण होते, तर हात धुवा दिनामुळे आरोग्य व स्वच्छतेच्या चांगल्या सवयी विकसित होतात.

या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ माहिती मिळवू नये, तर ती आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावी, हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. वाचनाची सवय, सर्वांप्रती आदरभाव आणि स्वच्छतेची जाणीव या तीन गुणांच्या आधारे सुजाण, संवेदनशील आणि आरोग्यसंपन्न नागरिक घडविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, दृष्टिबाधित व्यक्तींविषयी आदरभाव आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी दृढ होण्यास निश्चितच मदत होईल.कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पटणे यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक लतिफ लदाफ, जीवन सूर्यवंशी आणि लक्ष्मीबाई शिकारे यांचे सहकार्य लाभले.

 
Top