वाशी (प्रतिनिधी)-  येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयातील विद्यार्थी समीर आनंद पानगावकर याने टेबल टेनिस स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा विद्यापीठ संघात स्थान मिळविले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि कला व वाणिज्य महाविद्यालय, कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरुष टेबल टेनिस स्पर्धेत समीरने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याची पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड झाली आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे यांच्या हस्ते समीरचा सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख प्रा. डॉ. रवी चव्हाण यांची सलग दुसऱ्यांदा विद्यापीठ संघाच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे म्हणाले की, महाविद्यालय विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सातत्याने यश संपादन करत आहे. ही यशाची घोडदौड अशीच कायम ठेवण्यासाठी संस्था आणि महाविद्यालय स्तरावर क्रीडा विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, विद्यापीठ संघातील खेळाडू 23 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत गुजरात येथे आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रवी चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. महादेव उंद्रे यांनी केले. तर प्रा. डॉ. बालाजी देवकते यांनी आभार मानले. यावेळी प्रा. डॉ. बालाजी देवकते, प्रा. श्यामसुंदर डोके, प्रा. कृष्णा थोरात यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.

 
Top