धाराशिव (प्रतिनिधी)- वाढदिवसाच्या आनंदाला सामाजिक सेवेची जोड देत भाजप युवा नेते राम जवान यांनी महत्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भटक्या-विमुक्त समाजातील नागरिक आणि ऊसतोड कामगारांना थंड पिण्याच्या पाण्याचे जार वितरित केले जात आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते या संवेदनशील उपक्रमाचा शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला.
उदरनिर्वाहासाठी सतत गावोगावी भटकंती करणारी कुटुंबे, ऊसतोडीसाठी गाव सोडून शेतशिवारात आणि कारखान्यांच्या परिसरात संसार थाटणाऱ्या मजुरांच्या जगण्याचा संघर्ष रोजचाच आहे. डोक्यावर उन्हाचा तडाखा, पोटासाठी दिवसभर कष्ट आणि त्यात पिण्याच्या पाण्याची गैरसोय, अशी दुर्दैवी परिस्थिती अनेकांच्या वाट्याला येते. अनेकदा पाणी साठवण्यासाठी प्लास्टिकच्या घागरींचा आधार घ्यावा लागतो. मात्र, कडक उन्हामुळे या घागरी गरम होतात आणि त्यातील पाणीही तापते. दिवसभर उन्हात राबणाऱ्या मजुरांना आणि त्यांच्या चिमुकल्या मुलांना तहान लागल्यावर थंड पाण्याचा एक घोट मिळणेही दुरापास्त होऊन बसते. अशा वेळी त्यांच्या रोजच्या जगण्यातील ही छोटी, पण महत्त्वाची अडचण ओळखून राम जवान यांनी थंड पाण्याचे जार उपलब्ध करून देण्याचा संवेदनशील निर्णय घेतला. त्यामुळे गावोगावी उपलब्ध असलेल्या थंड पाण्याच्या आरओ प्लांटमधून पाणी भरून अनेकांची तहान भागणार आहे. कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासादरम्यान पिण्याचे पाणी सोबत ठेवणेही सोयीचे होणार आहे. विशेषतः उन्हात कष्ट करणाऱ्या मजुरांना आणि त्यांच्या मुलांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमातून गरजू कुटुंबांना पिण्याचे पाणी साठवून ठेवण्यासाठी एक उपयोगी साधन मिळणार असून, त्यांच्या दैनंदिन अडचणीही कमी होणार आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी भटक्या-विमुक्त समाजातील नागरिक आणि ऊसतोड कामगारांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. समाजातील गरजू घटकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना दिलासा देणारे उपक्रम राबविणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. धाराशिव जिल्हा दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना गरजू आणि वंचित घटकांच्या मदतीसाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाच्या प्रसंगाचे रूपांतर सामाजिक उपक्रमात झाले, तर त्या आनंदाचा लाभ समाजातील इतरांनाही मिळू शकतो, असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
हार-तुरे नकोत; गरजूंच्या आयुष्यात आनंद फुलवा
आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार-तुरे, सत्कार आणि इतर औपचारिक कार्यक्रमांऐवजी दुष्काळग्रस्त, गरजू आणि वंचित घटकांना मदत करणारे सामाजिक उपक्रम राबवावेत. समाजातील अडचणीत असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर समाधान आणण्यासाठी केलेले काम हीच माझ्यासाठी वाढदिवसाची सर्वोत्कृष्ट भेट असेल. तहानलेल्या ओठांवर फुलणारे समाधानाचे हास्य, गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर निर्माण होणारा आनंद आणि मदतीतून जपलेली माणुसकी हीच कोणत्याही वाढदिवसाची सर्वांत मोलाची भेट ठरू शकते. त्यामुळे अशा संवेदनशील उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू आणि वंचित घटकांना दिलासा मिळेल असे उपक्रम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्राधान्याने अंमलात आणावे असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले
