कळंब (प्रतिनिधी)- आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पदवी बरोबरच नाही. विद्यार्थीदशेतच आत्मविश्वास, संवाद कौशल्य, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे गरजेचे आहे. व्यक्तिमत्व विकास हा यशस्वी करिअरचा पाया आहे. असे प्रतिपादन सोपान पवार यांनी केले. येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय विद्यार्थी समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
महाविद्यालयाच्या स्वातंत्र्यसेनानी पंढरीनाथ नाना बारकुल सभागृहात या कार्यशाळेचे उद्घाटन ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हेमंत भगवान उपस्थित होते. उपप्राचार्य के.डी.जाधव आणि प्रबंधक हनुमंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. पहिल्या सत्रात व्यक्तिमत्व विकास या विषयावर विद्याभवन हायस्कूलचे सहशिक्षक सोपान पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत तीन सत्रे घेण्यात आली. दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. हेमंत भगवान यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर डॉ.के.डब्ल्यू. पावडे यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात उपप्राचार्य डॉ. के. डी.जाधव यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या सत्रात प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी लेखन व संभाषण कौशल्य या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या संधी बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा काकडे यांनी तर केले. तर आभार डॉ. दादाराव गुंडरे यांनी मानले. या कार्यशाळेसाठी डॉ.परमेश्वर वाकडे आणि प्रा.मारुती शिंपले, प्रा.डॉ.बालाजी वाघमारे संदीप सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
