धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाला जिल्ह्यात अधिक गती देण्यात येत असून, हर घर जल प्रमाणित गावांमधील पाणी स्रोतांची तपासणी, दूषित स्रोतांवर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तपासणीच्या नोंदी WQMIS  पोर्टलवर अद्ययावत करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या दि. 23 सप्टेंबर 2026 रोजीच्या निर्देशानुसार संबंधित यंत्रणांनी पाणी गुणवत्तेशी संबंधित कामे अग्रक्रमाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील 14,927 हर घर जल प्रमाणित गावांपैकी 6,656 गावांमध्य FTK (Field Testing Kit) द्वारे पाणी गुणवत्ता तपासणी करण्यात आली आहे. मात्र, तपासणीची प्रगती अपेक्षेप्रमाणे नसल्याने उर्वरित हर घर जल प्रमाणित गावांमधील पाणी स्रोतांची तपासणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र शासनाकडून या कामांचा नियमित आढावा घेतला जात असून, संबंधित सर्व यंत्रणांनी तपासणी पूर्ण करून त्याच्या नोंदी  WQMIS  पोर्टलवर विहित कालावधीत अद्ययावत कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.


 सर्व पाणी स्रोतांची तपासणी करण्यावर भर

जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमासाठी निर्धारित मार्गदर्शक सूचनांनुसार पाणी स्रोत, शाळा, अंगणवाड्या, गावातील दोन घरगुती नळ जोडण्या, जलशुद्धीकरण केंद्रे तसेच ESR/GSR  यांची प्रयोगशाळेत किंवा FTK/FIK संचाच्या माध्यमातून तपासणी करण्यात यावी. तसेच विविध कालावधीत करण्यात आलेल्या तपासणीच्या नोंदी संबंधित कालावधीतच WQMIS  पोर्टलवर नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विशेषतः हर घर जल प्रमाणित गावांमधील घरगुती नळ जोडण्यांची रासायनिक तपासणी FTK/FIK द्वारे करून त्याच्या नोंदी WQMIS  पोर्टलवर घेण्यात याव्यात, असेही निर्देश आहेत.


दूषित व अति जोखमीच्या पाणी स्रोतांवर तातडीने उपाययोजना

पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची उद्दिष्टानुसार तसेच मान्सूनपश्चात निर्धारित वारंवारतेनुसार तपासणी करण्यात यावी. तपासणीदरम्यान दूषित आढळणाऱ्या पाणी स्रोतांवर कोणताही विलंब न करता आवश्यक प्रतिबंधात्मक व सुधारात्मक उपाययोजना करण्यात याव्यात.तसेच  Decision Support System   मधील ‘Priority Village’  यादीतील अति जोखमीच्या पाणी स्रोतांची तपासणी करून त्यावर आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात आणि केलेल्या कार्यवाहीची नोंद WQMIS  पोर्टलवर अद्ययावत करावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.


‌‘सुजलाम शक्ती' गटाच्या माध्यमातून महिलांचा सहभाग

पाणी गुणवत्ता सनियंत्रणामध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक गावातील पाच महिलांची निवड करून ‌‘सुजलाम शक्ती गट' स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निवड केलेल्या पाच महिलांपैकी दोन महिलांना पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण देण्यात यावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.


पाणी तपासणी प्रयोगशाळांचे बळकटीकरण

जिल्ह्यातील पाणी तपासणी प्रयोगशाळांचे बळकटीकरण करून सर्व पाणी तपासणी प्रयोगशाळा NABL प्रमाणित करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच संबंधित सर्व प्रयोगशाळांची माहिती व नोंदी WQMIS  पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना जल जीवन मिशनच्या कामांची प्रत्यक्ष माहिती

जल जीवन मिशनअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कामांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती मिळावी, यासाठी उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या क्षेत्रभेटी आयोजित करण्यावरही भर देण्यात आला आहे.या अंतर्गत विद्यार्थ्यांना जलशुद्धीकरण केंद्रे, एकापेक्षा अधिक गावांसाठीच्या पाणीपुरवठा योजना, SCADA/IoT प्रणाली तसेच NABL प्रमाणित पाणी तपासणी प्रयोगशाळा यांना भेटी देऊन जलपुरवठा व्यवस्था, पाणी गुणवत्ता तपासणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत माहिती देण्यात येणार आहे.

याच अनुषंगाने दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी प्रत्येक जिल्ह्यातील एका उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची जवळील पाणी तपासणी प्रयोगशाळेस भेट आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यापुढेही नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांच्या क्षेत्रभेटी आयोजित करून त्याबाबतचा अहवाल राज्य पाणी व स्वच्छता मिशन कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


केंद्र शासनाच्या पुढील निधीशी कार्यवाहीचा संबंध

जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत वरील विविध कामांच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा केंद्र शासनाकडून पुढील निधीचा हिस्सा वितरित करण्याशी संबंध असल्याने, पाणी गुणवत्ता तपासणी, WQMIS  पोर्टलवरील नोंदी, अति जोखमीच्या स्रोतांवरील उपाययोजना, सुजलाम शक्ती गटांची स्थापना, महिला प्रशिक्षण तसेच प्रयोगशाळांचे बळकटीकरण या सर्व बाबींवर संबंधित यंत्रणांनी अग्रक्रमाने कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी प्रत्येक नागरिकाला उपलब्ध करून देण्यासाठी पाणी स्रोतांची नियमित तपासणी आणि दूषित स्रोतांवर तातडीने उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित सर्व यंत्रणांनी जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत देण्यात आलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करून पाणी गुणवत्ता तपासणीची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी व सर्व नोंदी WQMIS  पोर्टलवर अद्ययावत कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषद धाराशिव प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


 
Top