धाराशिव (प्रतिनिधी)- येणाऱ्या 70 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाटंग्री येथे भारतीय स्टेट बँकेच्या वतीने 120 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. एसबीआयचे शाखा व्यवस्थापक अमित ताराचंद ढेंगरे यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. धाराशिव जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा एसबीआयचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणारा आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार असून, सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेशही देण्यात आला आहे.
यावेळी एसबीआयचे मिलिंद मुंडे, स्वप्नील कावडे, शेषनाथ माहतो, अमित ढेंगरे, आशीष आगारकर, मिलिंद घोरे, मेहबूब सय्यद यांच्यासह एसबीआयचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री कल्याणी, शिक्षक कांबळे अरुण, मसलेकर राहुल, खराडे अरुण, सर्जे अशोक, शैला भंडारे, मनीषा साठी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.
