धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा येथून गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस दोन पिकअप वाहनांतून, तर 13 जर्शी गायी कत्तलीसाठी आयशर टेम्पोतून लातूरच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला. पोलिसांनी वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदापूर शिवारात सापळा रचून दोन पिकअप व एका आयशर टेम्पोसह एकूण 27 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत 13 गोमातांना कत्तलीपासून वाचविण्यात आले.
पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 30 सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करीत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली. परंडा येथे गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस दोन पिकअप वाहनांत भरले असून, एका आयशर टेम्पोत जर्शी गायी कत्तलीसाठी दाटीवाटीने भरून भूम, पारडी, येरमाळा मार्गे लातूरकडे नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हायवेलगत इंदापूर शिवारात सापळा रचला. काही वेळाने माहितीतील दोन पिकअप वाहने आणि आयशर टेम्पो तेथे येताच पोलिसांनी शिताफीने वाहने थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान दोन्ही पिकअप वाहनांमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस भरल्याचे आढळून आले. तसेच आयशर टेम्पोमध्ये 13 जर्शी गायी चारा व पाण्याची योग्य व्यवस्था न करता दाटीवाटीने बांधून कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे आढळले. पोलिसांनी तिन्ही वाहने आणि त्यामधील व्यक्तींना वाशी पोलीस ठाण्यात आणले. एकूण 27 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस हवालदार महेबुब अरब, सुभाष चौरे आणि प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली.
