धाराशिव (प्रतिनिधी)- लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग सुनिश्चित व्हावा,तसेच एकही पात्र मतदार मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर 17 व 18 ऑक्टोबर प्रमाणेच येत्या 24 व 25 ऑक्टोबर 2026 रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.या शिबिरांच्या माध्यमातून नवमतदारांसह पात्र नागरिकांना मतदार यादीत आपले नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध होणार आहे
भारत निवडणूक आयोगाने 12 ऑक्टोबर 2026 रोजी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.त्यानुसार मतदार यादीसंदर्भात दावे व हरकती सादर करण्यासाठी 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.तसेच अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या सुधारित कार्यक्रमाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांना आणि नवमतदारांना मतदार यादीत आपली नावे नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार, 24 ऑक्टोबर आणि रविवार,25 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या विशेष शिबिरांसाठी मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने 9 सप्टेंबर 2026 रोजीच्या पत्राद्वारे दिलेल्या सर्व सूचना लागू राहणार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्रावर शिबिरांचे योग्य आणि प्रभावी नियोजन करावे.तसेच शिबिरांच्या आयोजनाचा नियमित अहवाल संबंधित कार्यालयाकडे सादर करावा,असे निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष मतदार नोंदणी शिबिरांच्या आयोजनात कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही,याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मतदारांना नोंदणी प्रक्रियेदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये,यासाठी आवश्यक नियोजन करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. यासंदर्भातील पत्र आणि त्यातील सर्व सूचना अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AAERO),मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात.संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल,याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मतदारसंघ व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे.
मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.त्यामुळे पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपल्या नावाची नोंद असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. विशेषतः नव्याने मतदानासाठी पात्र ठरलेल्या युवक-युवतींनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी व्हावे.
मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष शिबिरांचा जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा.तसेच मतदार यादीसंदर्भातील दावे व हरकती 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत सादर कराव्यात,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.