तुळजापूर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या NIC  सर्व्हरच्या माध्यमातून e-POS मशीनवर वारंवार निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे रास्त भाव धान्य दुकान परवानाधारकांसह लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही अद्याप ठोस सुधारणा झालेली नसल्याने राज्य फेडरेशनच्या आवाहनानुसार सोमवार, दि. 7 सप्टेंबर 2026 रोजी धाराशिव जिल्ह्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानांवरील e-POS मशीनची वितरण व्यवस्था दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे.

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना गेल्या काही महिन्यांपासून e-POS मशीनवरील इंटरनेट व सर्व्हर सेवेमध्ये सातत्याने तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे धान्य वितरणाच्या वेळी मशीन व्यवस्थित चालत नसल्याने दुकानदार तसेच धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या समस्येबाबत संबंधित प्रशासनाला दरमहा वारंवार माहिती देण्यात आली. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप राज्य फेडरेशनकडून करण्यात आला 

धाराशिव जिल्ह्यातील  सर्व रास्त भाव धान्य दुकान परवानाधारक 7 सप्टेंबर रोजी e-POS मशीनवरील संपूर्ण धान्य वितरण व्यवस्था बंद ठेवणार आहेत. या एकदिवसीय बंदची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि e-POS प्रणालीतील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून दुकानदार व लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

 
Top