धाराशिव (प्रतिनिधी)- पावसातील मोठ्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना शासनाची ठोस मदत मिळावी यासाठी नुकसानीची शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ पाहणी करून अहवाल सादर करण्यासाठी आपण जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल व कृषी यंत्रणेला तातडीने पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आज या पाहणी कार्यक्रमात स्वतः सहभागी होत प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. आठवडाभरात जिल्हास्तरीय अहवाल शासनाकडे सादर होईल. अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
शनिवारी वाशी तालुक्यातील तेरखेडा परिसरातील व तुळजापूर तालुक्यातील इटकळ परिसरातील शेतांमध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शास्त्रीय व वस्तुनिष्ठ पद्धतीने नुकसानीची पाहणी करण्यात आली. शास्त्रज्ञ, कृषी विभागातील तज्ज्ञ आणि महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पावसातील खंडाचा पिकांवर झालेला परिणाम, पिकांची सद्यस्थिती, नुकसानीची तीव्रता आणि संभाव्य उत्पादनातील घट याची माहिती घेतली. नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे पाहणीत स्पष्ट झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषांनुसार मदत मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळू शकते. त्यामुळे प्रशासनाकडून तयार होणाऱ्या अहवालावर आपले जातीने लक्ष आहे, तो वेळेत शासनाकडे सादर व्हावा यासाठी आपला पाठपुरावाही सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.
यावेळी तेरखेडा येथे सुधीर घोलप, प्रवीण घुले, प्रभाकर सारूक, अरुण धालगडे, मदन बारकुल, आदेश घुले यांच्यासह शेतकरी बालाजी घुले, मंगेश कडवकर, शिवाजी धुमाळ, बाबासाहेब घुले, उमाकांत मनगिरे, रुपेश उमरदंड आदी उपस्थित होते. तर इटकळ येथे जिल्हा परिषद सभापती सिद्धू कोरे, पंस सभापती विक्रम देशमुख, बाजार समिती सभापती संतोष बोबडे आदी उपस्थित होते. यावेळी या दौऱ्यात शास्त्रज्ञ, आयआयटीचे पथक, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांच्यासह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.
