धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या महिन्या दीड महिन्यापासून पाऊस गायब झाल्यामुळे मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर दुष्काळाचे भीषण सावट घोंगावत असून आता पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांचा चारा व अन्नधान्याच्याही अभूतपूर्व टंचाईला तोंड द्यावे लागेल, त्यामुळे केंद्र व राज्यातील डबल इंजिन सरकारने आमदार ,खासदार व नगरसेवक यांचा बैल बाजार न मांडता आता तातडीने अशा भीषण दुष्काळी संकटाची दखल घेऊन महाराष्ट्रात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी समाजवादी नेते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभर पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनला शेंगा, कापसाला बोंडे ,मक्याला कणसे धरण्याची वेळ आली असतानाच ऐन फुलोऱ्याच्या वेळी पाऊस गायब झाला. सोन्यासारखी पिकं शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखत वाळू लागली. ज्या शेतकऱ्याकडे विहिरी किंवा पाण्याचे स्त्रोत आहेत त्यांनी जुलै महिन्यातील पावसात जमा झालेल्या पाण्यावर शिवार भिजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पाणीसाठाही संपल्याने आता पिक जगवायची कशी असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला. मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सोयाबीन ,कापूस, मका, तूर, हळद ही पिक करपून गेली. उडीद, मूगही हातचे गेले. लाखो हेक्टर वरील पिकांनी माना टाकले आहेत .सर्वच पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांचा पैसा तर वाया गेलाच पण शेती फुलवण्यासाठी घेतलेले काबाडकष्टही मातीमोल ठरले. मांजरा धरणासह संपूर्ण मराठवाड्यातील लहान मोठ्या धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे .विदर्भातही अनेक लघु व मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. सप्टेंबरचा पहिला आठवडा संपत आला तरी पावसाची चिन्ह दिसत नसल्याने गहू व हरभऱ्यासह रब्बी पिकांची पेरणी तरी होऊ शकेल की नाही या चिंतेने आता शेतकऱ्यांना ग्रासले आहे .ऐन पावसाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जमिनी अशाच कोरड्याठाक राहिल्या तर जनावरांच्या चाऱ्यासाठी आवश्यक असलेला मका, ज्वारीचा चारा आणायचा कुठून व पुढचे सात-आठ महिने पशुधन जगवायचे कसे याची चिंता सर्व शेतकऱ्यांना लागली आहे .एकीकडे सरकार मधील आमदार, खासदार व मंत्री पीक पाहणी व पिकाचे झालेले नुकसान याचे पंचनामे करण्याची फक्त नौटंकी करत आहेत. लाखो रुपये खर्च करूनही उत्पादनाची शाश्वती नाही. शेतकऱ्याने सोयाबीन पिकासाठी सुरुवातीपासूनच मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे, शेतीची मशागत, पेरणी, बियाणे, खताचा वापर ,तननियंत्रण ,कीड व रोगापासून संरक्षणासाठी औषधांची फवारणी तसेच मजुरी यामुळे उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत गेला आहे, या सर्व खर्चानंतर चांगले उत्पादन मिळेल आणि कर्जाचा बोजा कमी होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु आता पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत व कष्ट संपूर्ण वाया गेलेले आहे . त्यामुळे आता महाराष्ट्रात पावसाअभावी झालेल्या नुकसानीची भरपाई सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्याची तात्काळ योजना आखावी असेही ॲड. भोसले यांनी म्हटले आहे.
