धाराशिव (प्रतिनिधी)- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, धाराशिव अंतर्गत गौरी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरातील नागरिकांना उत्सवासाठी आवश्यक असलेल्या विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासोबतच ग्रामीण महिला स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष विक्री महोत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद धाराशिव समोरील जागेत दिनांक 7 सप्टेंबर 2026 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यामध्ये उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत एकूण 15,384 स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करण्यात आलेली असून, या गटांच्या माध्यमातून 1,46,119 सदस्यांचा सहभाग आहे. या माध्यमातून 1,46,119 कुटुंबांचे समावेशन झालेले आहे. स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना विविध व्यवसाय व उत्पादनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम सुरु आहे. धाराशिव जिल्हयातील महिला विविध दर्जेदार उत्पादनांचे उत्पादन करत आहेत. तसेच गौरी गणपती उत्सवाच्या निमित्ताने आवश्यक असलेल्या गौरी-गणपतीच्या सजावटीच्या वस्तू, तोरणे, फुलांच्या माळा, कापडी व हस्तकला सजावटीच्या वस्तू, पणत्या, दिवे, पूजेच्या परड्या व टोपल्या, आसन, पूजेचे वस्त्र, रांगोळी, अगरबत्ती, धूप, नैवेद्याचे पदार्थ, फराळाचे पदार्थ, विविध प्रकारची मिठाई, मसाले, पापड, लोणची, चटण्या, घरगुती खाद्यपदार्थ तसेच इतर पारंपरिक व स्थानिक उत्पादनेदेखील या विक्री महोत्सवात उपलब्ध असणार आहेत. जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता गटांमधील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि महिला स्वयंसहाय्यता गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीतून उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी या विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना गौरी गणपती उत्सवासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी स्थानिक महिला उत्पादकांकडून करण्याची संधी मिळणार आहे.