धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या विविध प्रलंबित व न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि राज्यव्यापी आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये जाऊन नाय व हक्काच्या मागण्या करण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर धाराशिव येथेही मुख्यमंत्री महोदयांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदनामध्ये धनगर जमातीच्या न्याय व हक्काच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत निवेदनातील प्रमुख मागण्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात चालू असलेली विशेष अनुमती याचिका महाराष्ट्र शासनाने पूर्ण ताकदीने व गांभीर्याने लढावी. दिनांक 8 सप्टेंबर 2026 पूर्वी शासनाने धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ ठोस, सकारात्मक आणि सर्व कायदेशीर व घटनात्मक बाबी स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करून अनुभवी व सक्षम वकिलांची नियुक्ती करावी. तसेच आरक्षणाबाबत कोणताही प्रतिकूल निर्णय आल्यास धनगरांना एसटीचे प्रमाणपत्र देण्यासाठी 'प्लॅन बी'तयार ठेवावा.
श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी विशेष शासकीय स्वतंत्र कायदा करण्यात यावा. या विश्वस्त मंडळामध्ये किमान 21 विश्वस्त असावेत आणि या देवस्थानचे अध्यक्ष हे धनगर समाजाचे असावे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक'ला स्वातंत्र्यवीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे. मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकास लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे. धनगर समाजाच्या न्याय व हक्काच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन संपूर्ण राज्यातील धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा. अशी आग्रहाची विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन सकल धनगर जमात जिल्हा धाराशिव व अहिल्या सखी मंच तसेच विविध संघटनांच्या वतीने देण्यात आले.यावेळी प्रा. सोमनाथ लांडगे, गणेश शिवाजीराव सोनटक्के, लिंबराज डुकरे, सुभाष मैंदाड, नाना वाकडे, दादा वाघे, व विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच अखिल भारतीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष एड. जयश्री तेरकर, अहिल्या सखी मंच धाराशिवच्या अध्यक्षा डॉ. शैलजा पैकेकर, दैवशाला हाके,अर्चना मैंदाड, काकडे व इतर महिला तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येळकोट येळकोट जय मल्हार तसेच बाळूमामाच्या नावानं चांगभलं अशा घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेलेला होता. हे निवेदन सकल धनगर जमात जिल्हा धाराशिवच्यावतीने राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
