उमरगा (प्रतिनिधी)-  मराठवाड्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्याने अनेक भागांतील सोयाबीन पिके पाण्याअभावी वाळत चालली आहेत. पावसाअभावी पिकांची अवस्था गंभीर झाली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, माडज आणि पेठ सांगवी येथे प्रत्यक्ष शेतावर जाऊन सोयाबीन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, पावसाचा खंड आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.

पावसाअभावी सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. अनेक शेतकऱ्यांनी पिकांवर केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याची व्यथा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे मांडली. नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. तसेच पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई व आवश्यक ती मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. अशा सूचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटाच्या काळात प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ पंचनामा होऊन त्यांना योग्य ती शासकीय मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी दिली. 


 
Top