मुरूम (प्रतिनिधी)- संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने गुरुवार, दि. 3 सप्टेंबर रोजी मुरूम शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. धाराशिव जिल्हा व उमरगा तालुका बंदच्या धर्तीवर पुकारण्यात आलेल्या या बंदला शहरातील व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक तसेच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत आपला पाठिंबा दर्शविला. सकाळपासूनच शहरातील बहुतांश दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा बसवेश्वर चौक, अण्णाभाऊ साठे चौक या मार्गावर घोषणा देत पायी रॅली काढण्यात आली. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा', ‘जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है', ‘जय जिजाऊ, जय शिवराय', ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
रॅलीचा समारोप पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजबांधवांनी मनोगते व्यक्त करत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळी बोलताना समाजबांधवांनी सांगितले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून, मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नासाठी संघर्ष करीत आहेत. मात्र सरकारकडून या आंदोलनाची अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची भावना समाजामध्ये आहे. मुरूम शहरातील काही समाजबांधवांना तहसील कार्यालयामार्फत कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली होती. मात्र त्यानंतर प्रमाणपत्राच्या वैधतेच्या प्रक्रियेत संबंधित कागदपत्रांवर प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शासनानेच दिलेली कागदपत्रे नंतर बनावट कशी ठरू शकतात?, असा सवालही समाजबांधवांनी उपस्थित केला.
मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास आगामी काळात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने टायर पेटवून शासनाच्या धोरणांचा जाहीर निषेध करण्यात आला. या आंदोलनात श्रीकांत बेंडकाळे, हणमंत वागदरे, सुधीर चव्हाण, भीमराव फुगटे, संजय बेंडकाळे, हणमंत टेकाळे, श्रीधर इंगळे, संजय सावंत, अजित चौधरी, महेश पाटील, राहुल वाघ, सचिन शिंदे, लखन भोंडवे, गोविंद सोबाजी, विकास शिंदे, प्रवीण बिराजदार, विशाल मोहिते, संदीप टेकाळे, वैभव शिंदे, संदीप जाधव, अक्षय शिंदे, प्रल्हाद माने, ज्योतिबा शिंदे, बाळू गुळवे, नंदू शिंदे, सत्यम फुगटे, शुभम टेकाळे, मुकुंद सूर्यवंशी, महेश शिंदे, किशोर शिंदे, प्रतीक भोंडवे यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मराठा आरक्षणाचा प्रश्न हा आमच्या समाजाच्या भवितव्याशी निगडित आहे. मनोजदादा जरांगे पाटील गेल्या अनेक वर्षांपासून समाजासाठी संघर्ष करीत आहेत. सरकारने आता केवळ आश्वासने न देता ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा मुरूम शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- राहुल वाघ.
सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कुणबी प्रमाणपत्र व त्याच्या वैधतेबाबत समाजबांधवांमध्ये अनेक प्रश्न आहेत. शासनाने या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा. गेली अनेक वर्षे आंदोलने सुरु आहेत, आमचा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील.
- लखन भोंडवे
मुरूम शहर बंदला व्यापारी आणि नागरिकांनी दिलेला प्रतिसाद हा मराठा समाजाच्या भावनेचा आवाज आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आता अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही. सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल.
- अजित चौधरी
