धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामनगर भागातील श्री सिद्धीविनायक सोशल फाउंडेशन संचलित, विजयसिंहराजे प्राथमिक विद्यालय येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण शाळा परिसर बालगोपाळांच्या जयघोषाने आणि रंगीबेरंगी वेशभूषेने नटला होता. या कार्यक्रमासाठी सौ. प्राची दिनेश कुलकर्णी आणि तृप्ती नकुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पाहुण्यांनी चिमुकल्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौतुक केले.

उत्सवासाठी शाळेतील लहान मुले श्रीकृष्ण आणि राधेच्या मनमोहक वेशभूषेत आली होती. त्यांच्या निरागस भावमुद्रांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या वेळी सर्व चिमुकल्यांनी एकत्र येत मोठ्या जिद्दीने आणि उत्साहाने मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडली. दहीहंडी फुटल्यानंतर सर्व बालगोपाळांना शाळेच्या वतीने भेळ आणि बिस्किटांचा 'प्रसाद' देण्यात आला. हा प्रसाद मिळताच मुलांचा आनंद द्विगुणित झाला आणि चिमुकल्यांनी या 'काल्याचा' आस्वाद घेत आणि नाचत गोकुळाष्टमीच्या उत्सवात रंग भरला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या कार्यालय अधीक्षक  प्रतीक्षा भिंगारे, मुख्याध्यापिका  लोमटे, माने सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


 
Top