धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या सहचारिणी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मंजुळकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ मंजुळकर यांनी वरील प्रतिपादन केले, ते म्हणाले की आपण नेहमी मंदिरांची सुंदरता पहात असतो,पण त्या सुंदर मंदिरासाठी जो मुख्य पाया असतो तिथे दगड स्वतःला टाकीचे घाव सोसून उभा राहिलेला असतो.श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही केवळ शैक्षणिक संस्था नसून एक ज्ञानाचे आणि संस्कारांचे मंदिर आहे ज्या मंदिराची उभारणी बापूजींनी केली,पण हे मंदिर उभा करत असताना एक सहचारिणी म्हणून श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांनी केलेला त्याग विसरता न येणारा आहे.आईचे कर्तव्य मुलांना खाऊ पिऊ घालून मुले वाढविणे इतकेच नसते,तर त्यांना संस्कार, ज्ञान देऊन आयुष्य घडविणे हे देखील असते ही बाब संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या चरित्रातुन लक्षात येते.स्वतःच्या इच्छा आकांक्षांना तिलांजली देऊन ही माऊली बापूजींसोबत महाराष्ट्र घडवण्यासाठी झगडत होती, त्याकाळी कुठलाही भेदभाव न बाळगता बहुजन समाजातील शिक्षणासाठी आलेल्या लेकरांना पोटच्या लेकरांसारखी माया लावून त्यांनी मुलांच्या मनात शिक्षणाविषयी आस्था निर्माण केली.महाराष्ट्र घडत असताना त्यांनी पाहिले.फक्त पुरुष प्रधान संस्कृती म्हणून चालणार नाही तर खऱ्या अर्थाने पुरुषार्थ जगणारे व्यक्तीत्व म्हणजे संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या संघर्षाचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा माधव उगिले यांनी तर आभार प्रा डॉ बालाजी गुंड यांनी मानले.यावेळी सर्व जण मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रा डॉ बालाजी गुंड यांनी मानले.
