धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी येथे निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत माता पालक मेळाव्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या आरोग्याची, व्यक्तिमत्त्व विकासाची आणि सर्वांगीण प्रगतीची जबाबदारी पालकांचीही तितकीच महत्त्वाची आहे, हा संदेश या मेळाव्यातून देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी सुमधुर स्वागतगीत सादर करून उपस्थित माता-पालकांचे उत्स्फूर्त स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ संजीवनी बाबासाहेब पौळ तर  प्रमुख उपस्थिती म्हणून येडशी बीटचे शिक्षणविस्तार अधिकारी श्री. महेश लवटे साहेब, येडशी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. बळीराम जगताप साहेब,शाळेचे मुख्याध्यापक श्री. बशीर तांबोळी,आरोग्य सेविका श्रीमती दारफळकर मॅडम, श्रीमती अमिना शेख मॅडम, उपाध्यक्षा सौ. अफसाना शेख, सदस्या सौ. अनिता पौळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. बशीर तांबोळी यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. पालकांनी, विशेषतः मातांनी, मुलांच्या अभ्यासाकडे नियमित लक्ष द्यावे, दररोज त्यांचा अभ्यास करून घ्यावा तसेच त्यांच्या आरोग्याची आणि दैनंदिन सवयींची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यानंतर शिक्षणविस्तार अधिकारी श्री. महेश लवटे साहेब यांनी उपस्थित माता-पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी महान शास्त्रज्ञ अल्बर्ट एडिसन यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगून विद्यार्थ्यांनी अडचणींवर मात करत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवावे, असा प्रेरणादायी संदेश दिला.

केंद्रप्रमुख श्री. बळीराम जगताप साहेब यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत आत्मनिर्भर शिक्षणावर देण्यात आलेला भर स्पष्ट केला. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी शाळा व पालकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये माता-पालकांचा सक्रिय सहभाग असण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

आरोग्य सेविका श्रीमती दारफळकर मॅडम यांनी उपस्थित महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच कुटुंबातील मुलांच्या आरोग्यविषयक सवयी, स्वच्छता, पोषण आणि आरोग्य तपासणी याकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

मेळाव्यामध्ये  100 माता-पालकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग वाढविणे, घरच्या घरी अध्ययनासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आणि शाळा-पालक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणे, हा मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.हनुमंत माने यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती सुमन इंगळे, श्रीमती नवले मॅडम, श्रीमती कदम मॅडम, श्रीमती मुपडे मॅडम, श्रीमती भंडारे मॅडम, श्रीमती वीर मॅडम, श्रीमती सावळकर मॅडम, श्री. पेठे दिनेश व श्री. राजेंद्र दीक्षित यांनी विशेष परिश्रम घेतले. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत आयोजित माता पालक मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

 
Top