तुळजापूर (प्रतिनिधी)- विनयभंग, मारहाण आणि ॲट्रॉसिटीसारख्या गंभीर कलमांखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात बसवंतवाडी येथील तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. धाराशिव येथील मे. विशेष सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर हा निकाल दिला. सरकार पक्षाला आरोप पुराव्यांच्या आधारे सिद्ध करता न आल्याने हा खटला आरोपींच्या निर्दोष मुक्ततेने निकाली निघाला.

नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. 185/2021 तसेच विशेष खटला क्र. 80/2021 शासन विरुद्ध जगन्नाथ व इतर या प्रकरणात हा निकाल देण्यात आला.


बांधकामाच्या ठिकाणी मारहाणीचा आरोप

दि. 31 मे 2021 रोजी एका 40 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354(अ), 324, 279, 337, 427, 323, 504, 34 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3(1)(), 3(1)(), 3(1)()()() अन्वये नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार, बसवंतवाडी, ता. तुळजापूर येथे घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आरोपी आले. त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून बांधकाम पाडले, फिर्यादी व तिच्या नातेवाईकांना धक्काबुक्की केली, दगडाने मारहाण केली तसेच फिर्यादीची साडी ओढून मारहाण केली, असा आरोप करण्यात आला होता. या घटनेत फिर्यादी व तिचे नातेवाईक जखमी झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.


‌‘गुन्हा नव्हे, जमीन वादातून कट'बचाव पक्षाचा युक्तिवाद

खटल्याच्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वतीने ॲड. एम. बी. माढेकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. आरोपींवर लावण्यात आलेले आरोप पुराव्याअभावी निराधार असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.बचाव पक्षाने असा दावा केला की, मुळात दिवाणी स्वरूपाचा असलेला वाद गुन्हेगारी प्रकरणाचे स्वरूप देऊन आरोपींची जमीन हडप करण्याच्या उद्देशाने प्रकरण दाखल करण्यात आले होते. फिर्यादी, साक्षीदार आणि त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांवर दबाव आणून आरोपींविरुद्ध खोटी केस दाखल करण्यास भाग पाडल्याचाही युक्तिवाद करण्यात आला.


वैद्यकीय पुराव्यातील विसंगतींवर बोट

प्रकरणातील साक्षीपुराव्यादरम्यान फिर्यादी व जखमी व्यक्तींच्या दुखापतींबाबत डॉक्टरांनी दिलेली साक्ष आणि त्यातील विसंगती बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. या प्रकरणात एकही साक्षीदार फितूर झालेला नसतानाही उपलब्ध साक्षी-पुराव्यांच्या आधारे सरकार पक्षाला आपली बाजू गुणवत्तेवर सिद्ध करता आली नाही, असा मुद्दा बचाव पक्षाने मांडला.


न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि प्रकरणातील वस्तुस्थिती व उपलब्ध पुराव्यांचा विचार केल्यानंतर मे. विशेष सत्र न्यायालय, धाराशिव यांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला. त्यानुसार तात्या उर्फ जगन्नाथ उत्तम शिंदे, मनोज शाहूराज मोरे आणि दादा उर्फ शिवाजी किसन पाखरे, सर्व रा. बसवंतवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव यांची सदर खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.


बचाव पक्षाकडून कोण?

या प्रकरणात बचाव पक्षाच्या वतीने ॲड. एम. बी. माढेकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. डी. ए. सरडे, ॲड. व्ही. एम. बारकुल, दिग्विजय वारे, स्वप्नील बोबडे आणि संकेत भोसले यांनी सहकार्य केले. गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल होणे आणि ते आरोप न्यायालयात पुराव्यांच्या कसोटीवर सिद्ध होणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. या प्रकरणात सरकार पक्षाला आरोप सिद्ध करता न आल्याने अखेर तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता झाली.


 
Top