धाराशिव (प्रतिनिधी)- श्री साई जनविकास प्रतिष्ठान संचलित अध्यापक महाविद्यालय (बी.एड.), आळणी, धाराशिव येथील विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमार्फत झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील 17 गुणवंत विद्यार्थ्यांची विविध जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच आदिवासी विकास विभागांतर्गत शिक्षक पदांसाठी निवड झाल्याने महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक पदासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये रेश्मा गायकवाड शेलके, अनिता दत्तात्रय तांबारे, संतोष निळकंठ ढले, दरेबा बाबुराव मोटे, कृष्णा योगेश शिंगणापुरे, योगेश सुधाकर वाघमोडे, आकाश सुनील बोंदर, वैभव व्यंकट बोंदर, अस्मिता रमेश जाधव, राणाउदयदसिंग प्रमोद पवार, कुंभार रूपाली जगन्नाथ, देशमुख धनराज, ज्ञानेश्वर धनंजय भुतेकर, धोंगे मयूर नागनाथ, शुभम गिरीश जगताप, अमृता राजेश गुंजाळ आणि आदित्य राजाराम हुरे यांचा समावेश आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, तसेच जिल्हा परिषद पालघर, पुणे, परभणी, रत्नागिरी, नागपूर, सातारा, अहिल्यानगर आदी ठिकाणी शिक्षक म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय ठाणे आदिवासी विकास विभागांतर्गतही निवड झाल्याचे अभिनंदन फलकावर नमूद करण्यात आले आहे.
शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून बी.एड.चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पवित्र पोर्टल ही महत्त्वपूर्ण संधी ठरली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक प्रक्रियेत यश मिळवत विविध शासकीय शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळविल्यामुळे श्री साई जनविकास प्रतिष्ठान अध्यापक महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फलित अधोरेखित झाले आहे. निवड झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील,संस्थेचे मार्गदर्शक करण पाटील तसेच व्ही.पी. शैक्षणिक संकुल, धाराशिव यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या भावी शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.