धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता संघर्ष करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. यावेळी त्यांची प्रकृती पाहून उपस्थितांच्या मनात भावनिक वातावरण निर्माण झाले.

उपोषणामुळे त्यांचे शरीर अशक्त झाले असले, तरी समाजाच्या प्रश्नांसाठी लढण्याची त्यांची जिद्द आणि निर्धार मात्र तितकाच प्रखर असल्याचे दिसून आले. त्यांच्या डोळ्यांत मराठा समाजाच्या प्रश्नांबद्दल असलेली तळमळ आणि असंख्य कुटुंबांच्या भविष्याची चिंता स्पष्टपणे जाणवत होती. “दादा, तुम्ही समाजासाठी लढत आहात; या लढ्यात समाजाची ताकद, प्रेम आणि सदिच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहेत,” अशा भावना व्यक्त करून त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. मराठा समाजातील लाखो कुटुंबांच्या मुला-मुलींच्या शिक्षण, रोजगार आणि उज्ज्वल भविष्यासाठी जरांगे पाटील संघर्ष करत आहेत. त्यांच्या आंदोलनामागे समाजाच्या विविध प्रश्नांची वेदना आणि न्याय्य हक्क मिळवून देण्याची भूमिका असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

उपोषणाच्या पाचव्या दिवशीही प्रकृती खालावलेली असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर संघर्षाची जिद्द कायम असल्याचे पाहायला मिळाले. “एक व्यक्ती उपाशी आहे कारण त्याच्या काळजात लाखो कुटुंबांच्या भविष्याची चिंता आहे,” या भावनेने त्यांच्या संघर्षाकडे पाहिले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, त्यांच्या संघर्षाला यश मिळावे आणि मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक व सर्वमान्य तोडगा निघावा, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

 
Top