तुळजापूर (प्रतिनिधी)- पावसाने पाठ फिरवल्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. पावसाअभावी खरीप पिकांची मोठी हानी झाली असून आगामी रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडल्याने शेतीबरोबरच शेतकरी, नागरिक आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात तत्काळ ‘कोरडा दुष्काळ' जाहीर करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रविंद्र भिमाशंकर इंगळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना प्रति एकरी 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे, तसेच पीक विम्याची रक्कम तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. याशिवाय सर्व राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांमधील शेतकरी कर्जे पूर्णपणे माफ करावीत आणि कोणतीही अट न ठेवता 100 टक्के विनाअट कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. दुष्काळग्रस्त भागात तातडीने मोफत चारा छावण्या सुरू कराव्यात, तसेच गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून नागरिक व पशुधनाला पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागातील मुला-मुलींचे संपूर्ण शिक्षण शुल्क माफ करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.
शासनाने पुढील आठ दिवसांत धाराशिव जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करून मदतकार्य सुरू केले नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रविंद्र इंगळे, प्रदेशाध्यक्ष घनश्याम चौधरी, कल्याणभाऊ भोसले, राजाभाऊ लकडे, दुर्वास भोसले, मकबुल सुभानी, शहाजी सोमवंशी, धनाजी पेंदे, आबाजी नरवडे, बळीराम बाबर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. ‘दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना वाचवा!' अशी आक्रमक भूमिका घेत संघटनेने शासनाला इशारा दिल्याने आगामी काळात धाराशिव जिल्ह्यात शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
