मुरूम ( प्रतिनिधी)- शेतीला जोडधंद्याची साथ देत पशुपालन व दुग्ध व्यवसायाकडे तरुणांनी स्वयंरोजगाराची मोठी संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. कोविड काळात शहरातून गावाकडे परतलेल्या अनेक तरुणांनी पुन्हा शहराची वाट न धरता पशुपालन व दुग्ध व्यवसाय सुरू केला. आज याच व्यवसायातून अनेकांना नोकरीपेक्षाही चांगले उत्पन्न मिळत आहे. खेड्यांचे चित्र बदलायचे असेल तर शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय उभे करणे आवश्यक असून, त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे नागपूर विस्तार शिक्षण विभागाचे माजी संचालक प्रा. डॉ. अनिल भिकाने यांनी केले. व्यापारी नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित, मुरूमच्या ३१व्या सर्वसाधारण सभेनिमित्त पशुपालन व्यवस्थापन व्याख्यान व शिबिराचे आयोजन रविवारी (ता. २७) रत्नमाला मंगल कार्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेवप्पा बडूरे होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. अनिल भिकाने यांच्यासह कार्यक्रमास पतसंस्थेचे चेअरमन उमेश कारभारी, उपाध्यक्ष अशोक चव्हाण, सचिव श्रीकांत मिनियार, संचालक दत्तात्रय गिरीबा, अंबाजी बिराजदार, सुरेश रणसुरे, प्रवीण सोलापुरे तसेच उमरगा येथील व्यापारी सुभाष गिरीबा यांची प्रमुख मान्यवर म्हणुन उपस्थिती होती.
यावेळी पतसंस्थेचे सचिव श्रीकांत मिनियार यांनी प्रास्ताविकासोबत संस्थेचा अहवाल वाचताना पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीची आकडेवारी सादर केली. ३१ मार्च २०२६ अखेर पतसंस्थेच्या ठेवी ८ कोटी ८४ लाख रुपये, गुंतवणूक ४ कोटी ५१ लाख रुपये, तर एकूण कर्जवाटप ७ कोटी ९९ लाख रुपये आहे. त्यापैकी सुरक्षित कर्जाचे प्रमाण ७ कोटी ४७ लाख रुपये असून, संस्थेची कर्जवसुली ८०.२८ टक्के आहे. पतसंस्थेला ऑडिट वर्ग ‘ब’ दर्जा प्राप्त असून सभासदांना १२ टक्के लाभांश वाटप करण्यात येत असल्याची माहिती मिनियार यांनी दिली. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी कार्यक्रमाध्यक्ष महादेवप्पा बडूरे व प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अनिल भिकाने यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर इतर मान्यवरांनी सत्कार स्वीकारला नाही.
पुढे बोलताना प्रा. डॉ. भिकाने म्हणाले की, ‘पशुपालक ते पशु उद्योजक’ हा मार्ग अत्यंत सोपा असून, सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास नियोजनबद्ध वेळ दिल्यास पशुपालन व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येतो. पशूंना योग्य व्यवस्थापन, आहार आणि विश्रांती मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पशूंना कमीत कमी १२ ते १३ तास रवंथ करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे, तसेच सुमारे १४ ते १५ तास बसण्याची विश्रांती मिळणे आवश्यक आहे. पशू जितका अधिक रवंथ करेल, तितके त्याचे आरोग्य चांगले राहून दूध उत्पादनास मदत होते, असे त्यांनी सांगितले. शेतीशी निगडित व्यवसाय करणाऱ्या अनेक तरुणांनी मेहनतीच्या जोरावर स्वतःचे आर्थिक विश्व निर्माण केले आहे. पशुपालन व दुग्ध व्यवसायासाठी आर्थिक अडचण भासल्यास व्यापारी नागरिक सहकारी पतसंस्था तसेच इतर बँका व पतसंस्थांच्या माध्यमातून कर्जसुविधेचा लाभ घेता येतो, असेही डॉ. भिकाने यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन अंबुरे यांनी केले, तर आभार सिद्रामप्पा तुगावे यांनी मानले. व्याख्यान व शिबिरास व्यापारी बांधवांसह शहरातील विविध वयोगटांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
