नळदुर्ग (प्रतिनिधी)-  नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात 3 सप्टेंबर रोजी अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणी अश्विनीच्या पतीसह सासू, सासरे आणि आत्त्यासासू अशा चौघांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर अश्विनीच्या दोन जुळ्या मुली वीरा आणि क्रांती गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यापैकी क्रांतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून वीरा हिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान विशेष म्हणजे अश्विनीने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवले होते. त्याचप्रमाणे इतर कुस्ती स्पर्धेमध्ये ही बरेच बक्षीस मिळवले आहे. अश्विनीचे वडील तानाजी शिवाजी मोहिते यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, अश्विनीला तिचा पती मनोहर अंकुश पौळ, सासरे अंकुश पंढरीनाथ पौळ, सासू कालिंदा अंकुश पौळ आणि आत्त्यासासू विमलबाई यांनी हुंड्याच्या मागणीवरून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अश्विनीला माहेरून सोन्याच्या पाटल्या तसेच रिक्षा घेण्यासाठी पैसे आणावेत, अशी मागणी करण्यात येत होती. या कारणावरून तिला मारहाण व मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या त्रासाला कंटाळूनच अश्विनीने आपल्या मुलांसह टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसांनी मनोहर अंकुश पौळ, अंकुश पंढरीनाथ पौळ, कालिंदा अंकुश पौळ आणि विमलबाई यांच्याविरुद्ध गुरनं. 429/2026, कलम 80, 108, 85, 3(5) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड करीत आहेत.

 
Top