धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाड्याचे प्रलंबित प्रश्न, योजनासाठी शिवसेना आक्रमक झाली असुन उद्धव ठाकरेंना यांच्या नेतृत्वाखाली 17 सप्टेंबरला छत्रपती संभाजी नगर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यापूर्वी 8 ही जिल्ह्यात मराठवाडाव्यापी आंदोलन होणार आहे. जे मुद्दे, कामे व घोषणा प्रलंबित आहेत त्याची सरकारला आठवण करून देण्यासाठी तहसीलदार स्तरावर निवेदन देण्यात येणार आहे. कर्नाटक राज्यात 30 टक्के पावसाची तुट आली असताना दुष्काळ जाहीर केला. मात्र महाराष्ट्र सरकारने 60 ते 70 टक्के पावसाची तुट असताना दुष्काळ जाहीर केला नाही. दुष्काळ जाहीर करणे सोडा सरकारने साधे पंचनामे करण्याचे सुद्धा आदेश दिले नाहीत. त्यामुळे 17 सप्टेंबरला शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तुमसे ना हो पायेगा हे आंदोलन संभाजीनगर येथे करण्यात येणार असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली.
यावेळी आमदार प्रवीण स्वामीसह सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, संजय निंबाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, रमाकांत टेकाळे हे उपस्थितीत होते. मराठवाडा स्वतंत्र होताना कोणत्याही अटीशिवाय सहभागी झालो. मराठवाड्यासाठी जाहीर केलेले विविध पॅकेज, योजना यांचा लाभ किती लोकांना झाला यांचा आढावा घेण्यासाठी 17 सप्टेंबरला उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजी नगर येथे येणार आहेत. तिथे आंदोलन व विभागीय आयुक्त यांच्याशी चर्चा करतील. 8 सप्टेंबर रोजी धाराशिव येथे एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली.
आमदार कैलास पाटील यांनी लोड शेडींग, वोल्टटेज ड्रॉप व वीज नसल्याने शेतकरी वैतागला असुन पिके जगवायची कशी असा प्रश्न आहे. दुष्काळ जाहीर करणे ही पाहिली मागणी असणार असुन दुष्काळी उपाययोजना सुरु कराव्यात अशी मागणी केली. कृष्णा मराठवाडा प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपातर करणे, पीक विमाबाबत सरकार उदासीन आहे, स्वतंत्र विद्यापीठ करावे, एमआयडीसीमधील प्लॉटचे दर भिगवण, पुणे यांच्याप्रमाणे कमी करावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन असल्याचे सांगितले.
भूंकपग्रस्त भागाला विशेष पॅकेज द्या
मराठवाड्यात अनेक शाळाची दुरावस्था असुन पाहणी करून शाळा दुरुस्ती करावी. पाणी साठवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आमदार प्रवीण स्वामी यांनी केली. भूकंपग्रस्त भागाला विशेष पॅकेज दिले नाही. 37 गावाचे पॅकेज देऊन पुनर्वसन करावे. उमरगा येथे उद्योग सुरु करावेत. शक्तीपीठसाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत, ही लाडके ठेकेदार सांभाळण्याची योजना आहे. बहुमत असतानाही सरकार आमदार व खासदार फोडण्यात वेळ देते मात्र जनतेच्या प्रश्नाला त्यांना वेळ नाही. यावेळी शिवसेना नेते मकरंद राजेनिंबाळकर यांनी नगरपालिकेच्या कारभारावर टिका केली.
