तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन सेवा तात्काळ मोफत सुरू करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. शासनाने मोठा गाजावाजा करून नागरिकांसाठी सिटी स्कॅन सेवा मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. काही काळ ही सेवा मोफत देण्यातही आली; मात्र आता उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅनसाठी शुल्क आकारले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

उपजिल्हा रुग्णालयात ग्रामीण भाग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येतात. तुळजापूर हे तीर्थक्षेत्र असल्याने बाहेरून येणाऱ्या भाविकांनाही उपचारासाठी या रुग्णालयाची गरज भासते. अशा परिस्थितीत सिटी स्कॅनसारखी महत्त्वाची तपासणी शुल्क आकारून उपलब्ध करून दिल्यास आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांना त्याचा मोठा फटका बसू शकतो, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी 24 तास सेवा देत असताना शासनाकडून आवश्यक त्या सुविधा आणि सहकार्य मिळणे गरजेचे असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. या मागणीचे निवेदन मिलिंद रोकडे, सुधीर जिवन कदम, रवि साखरे, सुरेश मस्के, सौरभ लोखंडे, कमलेश कदम , ज्ञानेश्वर बनसोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आल्याची माहिती आहे.


 
Top