धाराशिव (प्रतिनिधी)- पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने केलेला संयुक्त पीक परिस्थिती पाहणी अहवाल मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालातील नुकसानीची तीव्रता लक्षात घेता तातडीने पीक पंचनामे करण्याचे आदेश मिळतील आणि त्यानंतर शेतकऱ्यांना अग्रीम अनुदानाचा दिलासा लवकर मिळण्याची प्रक्रिया केलीजाईल, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
जून-जुलैमध्ये पाऊस समाधानकारक असतानाही ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ 27.9 टक्के पाऊस झाला. उमरगा वगळता जिल्ह्यातील बहुतांश भागात 27 दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड राहिला. जमिनीतील उपलब्ध ओलावा 15 ऑगस्टनंतर 25 टक्क्यांखाली गेल्याचे संयुक्त पाहणीत स्पष्टपणे आढळले आहे. त्यामुळे फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीनसह खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे.
महसूल, कृषी विभाग, कृषी शास्त्रज्ञ आणि आयआयटी मुंबई येथील तज्ज्ञांच्या मदतीने महाराष्ट्रात प्रथमच अशा पद्धतीने जिल्ह्यातील पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले. प्राप्त अहवालानुसार हलक्या जमिनीतील पिकांचे सुमारे 70 ते 80 टक्के, तर मध्यम व भारी जमिनीतील पिकांचे 50 ते 60 टक्के नुकसान झाल्याचे या संयुक्त पाहणी अहवालात निदर्शनास आले आहे.
एसडीआरफच्या मदतीसोबत इतरही मदत
आठही तालुक्यांत दुष्काळसदृश गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एसडीआरफच्या मदतीसोबतच दुष्काळी उपाययोजना व अनुषंगिक मदतीचा प्रत्यक्ष दिलासा शेतकरी बांधवांना मिळेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपले प्रयत्न सातत्याने सुरूच राहतील. दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आपले महायुती सरकार न्याय्य मदत व आवश्यक दिलासा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
