धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून ग्रामीण कुटुंबांना आधार देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून, जिल्ह्यात 24.56 लाख मनुष्यदिवसांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे 59 हजार 998 कुटुंबांना काम मिळणार आहे. सध्या जिल्ह्यात 27 हजार 369 कामे प्रगतिपथावर असून, त्यावर एकूण 145.12 कोटींचा खर्च झाला आहे. आता मजुरांना 125 दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील कष्टकरी हातांना गावातच काम मिळावे. त्याप्रमाणे अपुऱ्या पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना रोजगारासाठी स्थलांतर करण्याची त्यांच्यावर वेळ येऊ नये आणि मिळालेल्या रोजगारातून कुटुंबाच्या संसाराला आर्थिक आधार मिळावा,या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)' अंतर्गत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सन 2025-26 मध्ये जिल्ह्याने निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक मनुष्यदिवसांची निर्मिती केली असून, हजारो ग्रामीण कुटुंबांच्या हाताला काम देतानाच गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामांनाही गती दिली आहे.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण 3 लाख 71 हजार 477 कुटुंबांची जॉबकार्ड नोंदणी झाली आहे. त्यापैकी सन 2025-26 मध्ये 49 हजार 706 नवीन कुटुंबांची नोंदणी करून त्यांना जॉबकार्डचे वाटप करण्यात आले.त्यामुळे ग्रामीण भागातील आणखी हजारो कुटुंबांसाठी रोजगार हमीची दारे खुली झाली आहेत.
सन 2025-26 मध्ये जिल्ह्याला 23.25 लाख मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र 24.56 लाख मनुष्यदिवसांची निर्मिती करण्यात आली. जिल्ह्याने 105.61 टक्के उद्दिष्टपूर्ती करत निर्धारित लक्ष्य ओलांडले आहे.ग्रामीण कुटुंबांना त्यांच्या गावात किंवा परिसरात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कामगिरी महत्त्वाची ठरली आहे.