धाराशिव (प्रतिनिधी)- उद्धवस्थ झालेली खरीप पीके, पाण्याची टंचाई या व इतर मागण्यांसाठी मागील दोन महिन्यांपासून शासन स्तरावर मागणी करुनही शासनाने दखल न घेतल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला व जनतेच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दि.21 सप्टेंबर रोजी मौजे येडशी ता.जि.धाराशिव येथे लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
कोरडा दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी रुपये 50 हजार मदत देण्यात यावी. पीक विमा कंपनीने वगळलेले चार ट्रीगर समाविष्ट करुन 25 टक्के आग्रीम व संपूर्ण पीक विमा मंजूर करुन वितरीत करावा. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50 हजार ऐवजी रुपये 2 लक्ष अनुदान द्यावे. खरीपाचे 85 टक्के पेक्षा अधिक नुकसान असताना 50 टक्के नुसान झाल्याचा चुकीचा अहवाल शासनाकडे पाठविला तो रद्द करुन 85 टक्के नुकसान झाले बाबत नविन अहवाल पाठविण्यात यावा. गुळ पावडर कारखान्यांना एफआरपी कायद्यामध्ये आणून ऊसाची बीले एफआरपी प्रमाणे देण्यात यावेत. महिला व शेतमजूरांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा. विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक व परिक्षा शुल्क माफ करावे. परतीच्या माणसूनमध्ये कृत्रीम पाऊस पाडण्यात यावा. शेतकऱ्यांना दिवसा आठ तास अखंडीत पूर्ण क्षमतेचा वीज पूरवठा देण्यात यावा. कर्ज माफी देताना शेतकऱ्यांचे सीबील खराब होऊ नये या साठी कायदा करावा. भारतीय शेती उद्धवस्थ करणारा भारत-अमेरीका कृषी करार रद्द करावा. जिल्ह्यातील पशुधन वाचविण्यासाठी चारा व पाण्याची व्यवस्था ताबडतोब करण्यात यावी. जिल्ह्यातील वाघ, बिबटे, डुक्करे, कुत्रे व वानरांचा ताबडतोब बंदोबस्त करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.
सर्व शेतीमालाला हमीभाव देणारा कायदा मंजूर करुन त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी. शेतकरी संघर्ष समितीचे संयोजक संजय पाटील दुधगांवकर यांनी केली आहे.